Skip to main content

महाभारत कथा

एका ईमेल मधून आलेली ही सुंदर महाभारत कथा सर्वाबरोबर वाटून घ्यावी म्हणून देत आहे.
यातून खूप चांगले विचार चांगली शिकवण मिळते. बोधपर आणि वैचारिक असल्याने आस्वाद सदरातून देतो आहे.
लेखक (किमान मला तरी) अज्ञात आहे. कोणाला माहिती असेन तर सांगावे ही विनंती.

महाभारत कथा

महर्षी व्यासांच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार असणारे महाभारत, आपल्याला अजूनही अनेक गोष्टी सांगत, शिकवत असते. महाभारतातील युद्धकांड तेवढेच प्रसिद्ध आहे. जवळपास ४० लाख योद्‌ध्यांचा समावेश असलेले हे युद्ध मानवी भावभावनांचे अनेक कंगोरे स्पष्ट करते. या युद्धाचा अभ्यास केला असता, त्यातून आजच्या व्यवस्थापनाचे अनेक नियम दिसतात. एका वाचकाने "प्रेरणा' पुरवणीसाठी आवर्जून ई-मेलने हा मजकूर पाठविला. भारतीय युद्ध आणि व्यवस्थापन यांचा संबंध यातून स्पष्ट होतो. .......
----------------------------------------------------------------------------
पार्श्‍वभूमी
भारतीय युद्धामध्ये मनुष्यबळ आणि योद्‌ध्यांचा विचार केला, तर कौरवांचे पारडे जड दिसते. कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी, तर पांडवांचे सात अक्षौहिणी होते. (एक अक्षौहिणी = २१,८७० रथ, २१,८७० हत्ती, ६५,६१० घोडे आणि १,०९, ३५० पादाती.)
पांडव तसे जन्मापासूनच अरण्यात होते, तर कौरव राजवाड्यात वाढलेले. युद्धाच्या आधीही पांडव १२ वर्षे वनवासात आणि एक वर्ष अज्ञातवासात होते. या साऱ्या काळात युद्धाच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी कौरवांना चांगला वेळ मिळाला. त्यामुळे पांडव हे मदतीच्या दृष्टीने पांचाल, यादव, मगध आणि चेदी यांच्यावर जास्त अवलंबून होते.
कौरवांच्या मागे हस्तिनापूरची सारी ताकद होती. त्याशिवाय युद्धाआधी कर्णाने विशेष मोहीम काढून बहुतेक देशांना अंकित केले होते. ती ताकदही कौरवांमागे होती.
आता प्रश्‍न उभा राहतो, की
तरीही पांडव विजयी झाले कसे?

----------------------------------------------------------------------------
युद्धाची तयारी
युद्धाच्या तयारीसाठी कौरव आणि पांडव या दोघांनीही काही गोष्टी केल्या.
कौरव -कर्णाने युद्धमोहीम आखली. अनेक देश अंकित करून घेतले आणि भरपूर खंडणी मिळवली.
यातून काय साध्य केले? खरेतर नुकसानच झाले, कारण युद्धात कौरवांची मनुष्य आणि धन या दोहोंचीही हानी झाली. त्याशिवाय इतक्‍या मोठ्या संख्येने नवे शत्रूही निर्माण झाले.
पांडव -यांनी स्वत-तील कमतरता दूर करण्याकडे लक्ष केंद्रित केले.
अर्जुनाने दिव्यास्त्रे मिळविली.
भीमानेही शस्त्राभ्यास सुरू ठेवला. त्याची हनुमानाशी भेट झाली, आशीर्वाद मिळाले.
युधिष्ठिराने विविध महर्षींकडून विविध शास्त्रांचे अध्ययन केले. त्याशिवाय छत्रसेन नावाच्या गंधर्वाकडून द्यूतविद्येचे धडेही घेतले. पुन्हा एकदा द्यूताचे निमंत्रण आले तर? या प्रश्‍नाचे उत्तर त्याने तयार ठेवले. या प्रशिक्षणानंतर तो द्यूतात अजिंक्‍य झाला, असे म्हणतात.
तात्पर्य - तुमच्यातील कमतरता दूर करा.

----------------------------------------------------------------------------
मित्रराष्ट्रे
कौरव - कौरवांची सत्ता केंद्रीय होती. त्या काळची ती सगळ्यात प्रबळ सत्ता मानली जात होती. असे असले, तरी त्यांची मित्र राष्ट्रे फारशी नव्हती. राजनैतिक संबंध असणारी राष्ट्रे थोडी आणि दूरवर असणारी होती. उदा. गांधार (शकुनी), सिंधू (जयद्रथ) आणि कंबोडिया (कंबोज-भगदत्त)
पांडव - स्वत-कडे धन आणि सत्ता नसली, तरी प्रबळ राष्ट्रांशी उत्तम संबंध होते. विवाहांमुळेही त्यांचे अतिशय प्रबळ राष्ट्रांशी संबंध जुळले होते. उदा.
पांचालांशी द्रौपदीमुळे.
अर्जुन आणि सुभद्रेच्या विवाहामुळे द्वारका,
सहदेव आणि विजयेमुळे मगध,
नकुल आणि कृण्मयीमुळे चेदी,
भीम आणि बलंध्रेमुळे काशी,
युधिष्ठिर आणि देविकेमुळे केकय,
अभिमन्यू आणि उत्तरेमुळे मस्य,
तर भीम आणि हिडिंबेमुळे राक्षस
व अर्जुन आणि उलुपी विवाहामुळे नाग राष्ट्र.
तात्पर्य - प्रबळ मित्र मिळवा.

----------------------------------------------------------------------------
नेतृत्व
कौरव - केंद्रीय नेतृत्व. एकावेळी एकच सेनापती सर्व ११ अक्षौहिणी सैन्याचे नेतृत्व करत होता. भीष्म, द्रोण, कर्ण, शल्य आणि अश्‍वत्थामा असे एकापाठोपाठ एक सेनापती झाले. एकाचा वध झाला, की सैन्याला नेताच नाही, अशी परिस्थिती थोडा काळ का होईना; पण होत होती.
पांडव - सैन्याचे नेतृत्व विभागले होते. एका अक्षौहिणीवर एक, असे सेनापती होते. त्यांचे नेतृत्व दृष्टद्युम्न हा सरसेनापती म्हणून करत होता. त्याच्याही वर अर्जुन होता आणि अर्जुनाचा सल्लागार कृष्ण होता.
विराट (मस्य), द्रुपद (पांचाल), सहदेव (मगध), द्रशकेतू (चेदी), सात्यकी (द्वारका) आणि शिखंडी (पांचाल)
तात्पर्य - जबाबदाऱ्या वाटून घ्या.

----------------------------------------------------------------------------
सांघिक भावना
कौरव - यांच्यात खरेतर सांघिक भावना नव्हती. युद्ध करण्याचे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे होते.
भीष्म - हस्तिनापुराचे रक्षण करेन, या प्रतिज्ञेसाठी लढले.
द्रोण आणि कृप - राजनिष्ठेचा चुकीचा अर्थ लावून लढले.
कर्ण - अर्जुनाबरोबरचे वैर आणि दुर्योधनाची मैत्री निभावण्यासाठी.
या साऱ्यांचेच मनोमीलन झाले असते, एक ध्येय राखता आले असते, तर चित्र वेगळे दिसले असते; परंतु त्यांच्यात एकवाक्‍यताच नव्हती.

----------------------------------------------------------------------------
पांडव - एक संघ, एक ध्येय. सैन्यातील प्रत्येकाच्या मनात युधिष्ठिर आणि कृष्ण या दोघांबाबत प्रचंड आदर होता. योद्धे म्हणून भीम आणि अर्जुनाचा दरारा होता. मुळात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक अतिरथी, महारथी आणि रथी एकमेकांचे नातेवाईक होते. ते सारे निर्णय प्रक्रियेचा एक भाग होते. त्यामुळे ते युद्ध साऱ्यांचेच होते.

तात्पर्य - यश मिळविण्यासाठी एकेकट्याचे प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. त्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्‍यक असतात.
वैयक्तिक चालना
कौरव - खरेतर कौरवांकडे प्रत्येकालाच चालना देण्याची आवश्‍यकता होती. एक दुर्योधन सोडल्यास युद्धाला फारसे कोणी अनुकूल नव्हते. त्यांचे चार प्रमुख योद्धे तर पांडवांच्याच बाजूने होते.
भीष्माने "मी पांडवांना मारणार नाही. रोज हजार सैनिक मारेन,' असे स्पष्ट सांगितले होते.
द्रोणांनीही पांडवांना मारणार नाही, पकडेन, असेच म्हटले होते.
शल्याची फसवणूकच झाली होती. तो पांडवांचाच. त्यामुळे त्याने कर्णाची सतत अवहेलना करून पांडवांना मदतच केली.
कर्णाचा राग फक्त अर्जुनावर होता. तो त्याचे वैयक्तिक युद्ध लढत होता. त्याने इतर पांडवांना न मारण्याचे वचनही दिले होते.

----------------------------------------------------------------------------
पांडव - पांडवांमध्येही वेगवेगळ्या योद्‌ध्यांची वैयक्तिक कारणे होती; ती कारणे त्यांचे सांघिक ध्येय गाठण्यासाठी पूरकच होती. उदा.
दृष्टद्युम्न - द्रोण
शिखंडी - भीष्म
सात्यकी - भूरिश्रवा
अर्जुन - कर्ण
भीम - दुर्योधन आणि त्याचे सारे भाऊ
नकुल - कर्णाची मुले
सहदेव - शकुनी आणि त्याची मुले
तात्पर्य - योग्य माणसे निवडूनच योग्य संघ तयार करता येतो. ठरविलेल्या कामासाठी योग्य माणूस निवडणे महत्त्वाचे.

----------------------------------------------------------------------------
निष्ठा
कौरव - मुख्य चार योद्‌ध्यांची खरी निष्ठा पांडवांकडेच होती.
भीष्मांनी तर स्वत-चा वध करण्याचा मार्ग स्वत-च पांडवांना सांगितला.
हाती शस्त्र आहे, तोवर मी अजिंक्‍य आहे, असे सांगून स्वत-च्या वधाचा मार्ग द्रोणांनीही दाखवून दिला.कर्णाने तर इतरांना हात न लावण्याचे वचन दिले होते. त्यामुळे शक्‍य असूनही त्याने युधिष्ठिर आणि भीमाचा वध केला नाही.
पांडव - केवळ सोळा वर्षांच्या अभिमन्यूने चक्रव्यूहात शिरण्याचे धाडस दाखविले. त्याने कौरवांच्या शेकडो वीरांनाही कंठस्नान घातले. आपण करतो आहोत, तो केवळ आत्मघात आहे, हे माहीत असूनही आपल्या पक्षासाठी त्याने ही उडी घेतली. त्याचा वध करण्यासाठी सात महारथींना एकत्रित प्रयत्न करावे लागले. घटोत्कचानेही मरता मरता स्वत-चा आकार वाढवून शेकडो शत्रूसैनिक मारले. कधीही असत्य न बोलणाऱ्या युधिष्ठिराने आपल्या संघाची गरज आहे म्हणून "नरो वा कुंजरो वा' केलेच.
तात्पर्य - संघाचे लक्ष्य गाठायचे असेल, तर वैयक्तिक हितसंबंध गौण मानले पाहिजेत.
एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीकडे फक्त गुण असून भागत नाही, कामावर पूर्ण निष्ठाही लागते.

----------------------------------------------------------------------------
व्यवस्थापक
कृष्ण हा सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक होता. अडचणीच्या गोष्टी सोडविण्यात त्याचा हातखंडाच होता.
युधिष्ठिर - पडद्याआडचा सूत्रधार. छोट्या छोट्या गोष्टींतून त्याने बऱ्याच गोष्टी साध्य केल्या.
युद्धाच्या पहिल्याच दिवशी तो एक डाव खेळला. युद्ध सुरू होण्याआधी कौरवांच्या पक्षात जाऊन सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतला. हे आशीर्वाद म्हणजे युद्ध जिंकण्याच्या क्‍लृप्त्याच होत्या.
तेथून परतल्यावर रणभूमीवर अजून एक चाल खेळली. त्याने दोन्ही सैन्यांना उद्देशून भाषण केले आणि कोणाला पक्ष बदलायचा असल्यास आताच बदला, असे आवाहन केले. हे आवाहन म्हणजे जाणीवपूर्वक उचललेली जोखीमच होती. त्याचा परिणाम होऊन युयुत्सू (दुर्योधनाचा भाऊ) पांडव पक्षात आला. या कृतीने साऱ्यांसमोर कौरवांमधील छिद्र उघडे पडले.
तात्पर्य - तुमच्या उणिवा शोधा आणि त्यांच्यावरचा उपायही!
जाणीवपूर्वक जोखीम पत्करायला हवी.

----------------------------------------------------------------------------
बालपणापासूनची वाटचाल, संस्कार
कौरव - कौरव हे राजवाड्यात युवराज, राजपुत्र म्हणूनच वाढले. त्यांची राजवट ही तत्कालीन प्रबळ राजवट होती. त्यामुळे सत्ता, संपत्ती आणि ताकद याच वर्तुळात त्यांचे संगोपन झाले.

पांडव - युद्धापर्यंतचा बहुतेक काळ अतिशय गरिबीत गेला. मुळात त्यांचा जन्मही हिमालयातील जंगलांमध्ये झाला. त्यामुळे जन्मापासूनच ऋषिमुनी, वनवासी आणि सामान्य नागरिकांपासून ते गंधर्व, अप्सरा, नाग आणि राक्षसांचाही सहवास लाभला. त्यांना विविध भागांतील, विविध संस्कृतींतील आणि विविध स्वभावांच्या माणसांचे दर्शन घडले, त्यांना जाणून घेता आले. मुळात सर्वांत खालच्या स्तरापासून वरपर्?ंत, अशा सर्व स्तरांवर त्यांचा वावर राहिला. मूलभूत जाणिवा समृद्ध होण्यास या सर्वांची प्रचंड मदत झाली. विचारविनिमय करणे, आपल्याकडचे दुसऱ्याला देणे आणि दुसऱ्यातील चांगले ते स्वीकारणे, हे आपोआपच घडत गेले.

तात्पर्य - मुळांची माहिती करून घ्या. सर्वांत खालच्या स्तरावरील माणसाची मते लक्षात घ्या. विविध संस्कृती, मतांचा आदर करा. माहिती करून घ्या. माहितीची देवाण- घेवाण करा.

----------------------------------------------------------------------------
स्त्रीशक्ती
कौरव - पुरुषप्रधान उतरंड. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग अजिबातच नाही. गांधारीला मखरातच ठेवले होते. तिच्या मतांना किंमत नव्हती.
पांडव - स्त्रीप्रधान संस्कृती. पांडवांमध्ये सर्वोच्च स्थानी कुंती होती. ती सांगेल तो धर्म मानला जात होता.
द्रौपदी ही पाचही जणांची अर्धांगी होती. निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ती पांडवांची स्फूर्ती होती. ती नसती तर पांडव वनांमध्येच राहिले असते, असे म्हटले जाते.
पुढच्या पिढीतील घटोत्कच, अभिमन्यू आणि इरावण यांचे पालनपोषण त्यांच्या आईनेच केले होते. त्यामुळे महिलांच्या मतांचा मोठा प्रभाव पांडवांवर होता.
तात्पर्य - स्त्री ही अर्धांगी असते. स्त्री नसणाऱ्या संघाचा तोल चुकतो. राकटपणा आणि बेधडक वर्तनाला सावरायला तरलता आणि सातत्य हेच गुण आवश्‍यक असतात.

Comments

Popular posts from this blog

गाय आणि सिंह

अर्थात गायीने फोडलेला हंबरडा,,,,, एका जंगलात पांढर्या ,काळ्या, आणि तपकिरी रंगाच्या तीन  गाई होत्या. अगदी धष्ट पुष्ठ त्यांच्यावर एक सिंहाचा डोळा होता . पण तिघींवर  हल्ला करण त्याला जमत नव्हत . कारण त्या एकत्र असत . बरेच दिवस तो त्यांच्यावर पाळत ठेवून होता. काय करायच काय करायच या  विचारात सदोदित होता , एक दिवस हिय्या करून तो तय गायीं जवळ गेला आणि म्हणाला मी या जंगलाचा राजा आहे , मला इतरही बराच कम असतात तेव्हा मला या जंगलाची साफ सफाई करायची आहे त्या मुळे तुमच्या चरयाची अड़चन होवू शकते . तुमच्या साठी मी शेजारच्या जंगलात एक कुरण राखीव ठेवल आहे . तुम्ही तिकडे जा,,,,,,, तशी ती तपकिरी गाय आनंदाने चित्कारली , काय म्हणता महाराज आमच्या साठी कुरण? सिंह म्हणाला हो पण एक अड़चन आहे , या पांढर्या गायीचा रंग आपल्या अगदी विरूद्ध आहे , म्हणजे बघा मी तपकिरी तुम्ही तपकिरी, मग हिला खावु का? हुरळ लेल्या गायीने लगेच संम्मती  दिली,,,,,, याच न्यायाने मग त्याने काळ्या गायीचा फडशा पडला ,,,, पण तो शांत थोडाच बसणार होता? दोघींना खावुन झाल्यावर त्याने आपला मोर्चा त्या तपकिरी गाई कड़े वळ

*नको देवराया अंत आता पाहू,,*

देवा ये लवकर तुझ्या पराक्रमाच्या गोष्टी खूप वाचल्या रे आमचा विश्वास ही आहेच त्यावर पण ये आता आता तूच या अदृश्य कोरोनाशी लढ आणि मुक्त कर☹ *प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू सदैव उभा राहतोस म्हणे,,* मग आमचे प्रयत्न दिसत नाही का रे देवा☹ जगाचा पालन कर्ता असलास तरी या भरतभूमीवर तुझं विशेष प्रेम,,सार जग सोडून तू तुझे सारे अवतार याच भरतवंशीयांसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच निर्दालन करण्यासाठी घेतलेस,,, *मग आजच असा निष्ठुर कठोर पाषाण हृदयी का झालास😏☹😡* अरे आम्ही तुझीच लेकरं ना रे मग आमची अवघ्या मनुष्य जातीची चाललेली परवड तुला दिसत नाही की अजून शेषशैये वरून उठायची वेळच झाली नाही की तुझा कुंभकर्ण झालाय देवा? *उठ रे दादा उठ*☹ मला माहिती आहे केवळ प्राण्यांची असलेली ही भूमी तू गुण्या गोविंदाने हे मनुष्यप्राणी ही राहतील या मोठया आशेने आम्हला ती  आंदण दिलीस☹ *पण आम्ही कपाळकरंटे रे ओरबाडली अक्षरशः ही भूमी ओरबाडली*😏😡 जीवन जगण्याच्या स्पर्धेत *आमचा बकासुर कधी झाला* ते आमचं आमच्याच कळलं नाही *आमचा हव्यास कधी संपेल माहिती नाही* आमची आयुष्य एकमेकांचा धर्म उणिदुनी काढण्यातच जाणा

राजा-माकड-आणि आपण ,,,

हि आहे एका आळशी आणि बुद्धू राजाची गोष्ट एकदा ह्या राजाला एक माकड काही तरी मदत करते. आणि त्यामुळे राजा त्याला आपला सेवक म्हणून तैनात करतो. प्रधान हे पाहून वैतागतो,राजाला समजावण्याचा प्रयत्न करतो पण राजा मानत नाही, प्रधान कपाळावर हात मारतो-  एकदा-दोनदा-तिनदा... असे ब-याचदा होते. एके दिवशी राजा झोपलेला असतो, माकड वारा घालत असते. एक माशी सारखी राजाच्या नाकावर बसायचा प्रयत्न करते. माकड तिला हकलायचा प्रयत्न करते, पण तरी ती पुन्हा पुन्हा येते म्हणून शेवटी चिडून माकड राजाच्या तलवारीने तिला मारायचा प्रयत्न करतो... आणि... राजाचे नाकच कापले जाते.. प्रधानजी हसतो... तात्पर्य -- ज्यांची लायकी नाही पात्रता नाही अशांच्या हातात जबाबदारी सोपवली कि काय होत ते हि गोष्ट सांगते ??,,,,,,,,,,,, आज नेमकी हि गोष्ट आठवायचं कारण ,,, शक्ती मिल कंपाउंड मध्ये जो फोटोग्राफर मुलीवर बलात्कार झाला त्यावर ईथे नेहमी प्रमाणे येवून सगळ्यांनी आपापली मत मांडली नेहमी प्रमाणे बांगड्या भरा ,चपलेने बडवा ,सरकार नालायक अशी मत मांडली गेली पण हि झाली फक्त चर्चा याच्या मुळाशी कुणीच प्रयत्न करू ईच्छित नाही आणि नेमकी कधी काळी वाचलेल